आपले स्वागत आहे!
रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित
“विना सहकार नाही उद्धार” हा आधुनिक युगातील महामंत्र स्वातंत्र पूर्व काळात आत्मसात करून कै. द. सि. सामंत‚ कै. बा. म. साळवी ‚ कै. पु. ब. महाडिक‚ कै. सि. ता. पाटील‚ कै. रा. कृ. मुळ्ये‚ कै. वि. गो. खेर यांच्या कल्पनेने व समर्थ साथीने दि २४. ८. १९२८ रोजी रजिस्टर नंबर ६२१९ ने रत्नागिरी तालुक्यासाठी सहकारी तत्वावर रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लि. या नावाने ही संस्था स्थापन करण्यात आली. त्यानंतर सन १९३३ पासून तिचे कार्यक्षेत्र संपूर्ण जिल्हा असे झाले. संस्थेच्या स्थापने पासून फेब्रुवारी १९६६ पर्यंत संस्था 'सहकारी बँक' म्हणून काम पाहत होती. तद्नंतर संस्थेच्या सभासदांच्या सोयीचा विचार करून दि ०१.०३.१९६६ च्या सर्वसाधारण सभेत सदर बँकेचे रुपांतर सहकारी पतपेढी मध्ये करण्यात येवून संस्था 'रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित' या नावाने पगारदार सेवकांची सहकारी संस्था म्हणून काम पाहू लागली
१ मे १९८५ ला महाराष्ट्र शासनाने भूतपूर्व रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन करून 'रत्नागिरी ' व 'सिंधुदुर्ग 'असे दोन स्वतंत्र जिल्हे केल्याने संस्थेचे 'रत्नागिरी ' व 'सिंधुदुर्ग ' असे दोन स्वतंत्र संस्थात विभाजन करावे असे ठरवण्यात आले. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० ने महाराष्ट्र शासनाने दि २०.०४.१९८५ चे आदेशाने संस्थेचे विभाजन 'रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित , रत्नागिरी व सिंधदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित, कुडाळ '' अशा दोन स्वतंत्र संस्थात केले व नवीन संस्था १ मे १९८५ पासून सदर आदेशान्वये रजिस्टर होवून अस्तित्वात आली. सहकार क्षेत्रात सातत्यपूर्ण काम करणारी विश्वासार्य, कार्यक्षम आर्थिक संस्था म्हणून या संस्थेची ओळख तुम्हाला करून देताना खूप अभिमान वाटतो. सातत्यपूर्ण वाढता नफा, आर्थिक क्षेत्रातील संस्थेला अभिमान वाटावा अशी सर्व आदर्श प्रमाणे ठेव वृद्धी बरोबरच मोठ्या प्रमाणावर सुरक्षित कर्जाचे वितरण त्याचप्रमाणे सातत्याने ०% एन.पी.ए. राखताना १००% वसुली प्रमाण राखले आहे. या साईटच्या माध्यमातून संस्थेबाबतची माहिती प्राप्त करणे आपल्या सारख्या जाणत्या व्यक्तीत्वासाठी रोचक ठरावे.
पतसंस्था व्रतस्थ पद्धतीने चालवण्याचा मानस ठेवून संस्थेचे सर्व संचालक आणि पदाधिकारी कार्यरत आहे. या संकल्पाला आजपर्यंत हजारोंची साथ मिळाली. आज या साईटच्या माध्यमातून संस्थेची आदर्शवत स्थिती आपल्या माहितीसाठी उपलब्ध करून देऊन आपले सर्वांचे ऋणानुबंध आणखीन द्रुढ करण्यास अत्यानंद होत आहे.